चित्री नदीवरील बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृत्यू
आजरा (प्रतिनिधी) : आजरा पासून जवळच असलेल्या चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये फिलिप अंतोन कुतिन्हो (वय ४०, रा. पुणे), लॉईड पास्कोन कुतिन्हो (वय ३५) आणि ॲड. रोझिरियो अंतोन कुतिन्हो यांचा समावेश आहे. आजरा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
नाताळ सणानिमित्त कुतिन्हो कुटुंबातील सदस्य पुण्यातून आजऱ्यात आले होते. २५ डिसेंबरला त्यांनी नाताळ साजरा केला. रविवारी (दि. २९ डिसेंबर) त्यांच्या नातलगांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तिघेही परोली बंधाऱ्यावर पोहायला गेले. दुपारी पोहत असताना तिघे बुडाल्याचे कळताच मित्र आणि नातेवाईकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रयत्न अयशस्वी झाले.फिलिप आणि ॲड. रोझिरियो हे सख्खे भाऊ होते, तर लॉईड त्यांचा चुलत भाऊ होता. ॲड. रोझिरियो आजरा न्यायालयात वकिली करत होते, तर लॉईड नेव्ही मर्चंटमध्ये कार्यरत होते. या घटनेमुळे आजरा शहर परिसरात दुःखाची छाया पसरली आहे.