एम आय एम कडे आम्ही पाठिंबा मागितला नाही... महाविकास आघाडीचे निवेदन दिली स्पष्टता

एम आय एम कडे आम्ही पाठिंबा मागितला नाही... महाविकास आघाडीचे निवेदन दिली स्पष्टता

कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्री शाहू छत्रपती महाराज उभे आहेत. या निवडणुकीत अनेक संघटना, पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. परंतू कोल्हापूरसाठी भूमिका घेताना मात्र आपआपल्या पक्षाची देशातील, राज्यातील भूमिका बाजूला ठेवून शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठींबा देत आहेत. या पार्श्वभूमीवर एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी शाहू छत्रपती यांना पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता  

खा. इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले होते की, मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यास सांगितले आहे. शाहू छत्रपती यांनी मला फोन केला नाही. त्यांनी माझ्याकडे समर्थन मागितलेले नाही. परंतु सर्वच राजकीय पक्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर आधारित राजकारण करतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोण आहेत? त्यांचे समाजातील स्थान काय आहे? हे आम्हाला माहित आहे. म्हणूनच मी ओवेसीना सांगितले की, शाहू छत्रपती यांच्यासारख्या चांगल्या उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका असली पाहिजे. म्हणून आम्ही शाहू छत्रपतींना मागणी केली नसतानाही स्वतःहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

 मात्र एमआयएम सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्यानेच असे प्रकार विरोधक करत आहेत. मात्र अशा प्रचाराला कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही. असे पत्रक इंडिया आघाडी व महाविकास आघाडी तर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

या निवेदनावर आमदार सतेज पाटील, व्ही. बी. पाटील, संजय पवार, विजय देवणे, संदीप देसाई यांच्या सह्या आहेत.