हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे ; शेवटी जनता रस्त्यावर उतरली अन् ... – संजय राऊत

हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे ; शेवटी जनता रस्त्यावर उतरली अन् ...  – संजय राऊत

मुंबई - महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीच्या अध्यादेशावर मोठं वादंग झाल्यानंतर अखेर राज्य सरकारला पावले उचलावी लागली. जनतेच्या तीव्र विरोधानंतर हा अध्यादेश मागे घेण्यात आला. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. “फडणवीसांनी अखेर शहाणपणाचा निर्णय घेतला आणि हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेतला. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ओळखण्याचा परिणाम आहे,” असंही ते म्हणाले. त्यांनी सरकारवर आरोप करत सांगितलं की, बराच काळ लोकांच्या भावना दुर्लक्षित करत खेळ खेळण्यात आला, पण शेवटी जनता रस्त्यावर उतरली. सर्व पक्षांनी मिळून या अध्यादेशाची होळी केली.

संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाची घोषणा झाल्यानंतर सरकार घाबरलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोकं या मोर्चासाठी येणार होते. त्यामुळंच सरकारनं माघार घेतली. आता कमिटी स्थापन कशासाठी केली जात आहे? आम्ही त्रिसूत्री भाषा धोरण मान्य करणार नाही, हे दोन्ही ठाकरे बंधूंनी स्पष्ट केलं आहे. फडणवीसांच्या शुभेच्छांनी मराठी माणूस एकत्र येत नाही. तुम्ही जर प्रफुल्ल पटेल, शिंदे, हसन मुश्रीफ यांच्यासोबत सत्ता बनवू शकता, तर दोन भाऊ एकत्र आले म्हणून पोटात का दुखतंय? आज तुम्हाला वैफल्य आलं आहे, हे स्पष्ट दिसतं असंही राऊत म्हणाले. 

राजकीय विरोधकांवर टीका करताना राऊत म्हणाले, “शिंदे कधी फडणवीसांना भ्रष्ट म्हणायचे, फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकणार होते, तर मोदी प्रफुल्ल पटेलांना दाऊदचा हस्तक म्हणायचे. आता हे सर्व एकत्र कसे आले? भूतकाळ उकरू नका. कोण संपलं, कोण वाढलं हे वेळ ठरवेल.” 

मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधत राऊत पुढे म्हणाले, “तुम्ही तीनवेळा मुख्यमंत्री होता, तरीही जर राष्ट्रीय धोरण राज्यासमोर आलं, तर त्यावर चर्चा करता येत नाही? उद्धव ठाकरे यांनी तयार केलेला रिपोर्ट सार्वजनिक करा. एक रिपोर्ट समोर आला आहे, त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकत नाही का?”

जुलै महिन्यात होणाऱ्या संभाव्य मोर्चाबाबत राऊत म्हणाले, “तयारी सुरू आहे. दोन्ही पक्षांनी आपापले नेते नियुक्त केले आहेत. आता याला विजयी जल्लोषाचं रूप द्यायचं आहे. राज ठाकरे यांच्याशी यावर चर्चा झाली असून, लवकरच मेळावा नक्कीच होईल. हा जल्लोष कोणालाही दूर ठेवून साजरा होणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.