कर्करोग विरोधी लसीकरणातून माझ्या लेकी आणि बहिणींना कवचकुंडले देणार : मंत्री, हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कागल प्रतिनिधी : देशात दर आठ मिनिटांना एक माता-भगिनी गर्भाशय कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे दुष्टचक्र थांबायलाच हवे. या कर्करोगमुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही माझ्या मुली आणि बहिणींसाठी कवचकुंडलेच आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सीएसआर अंतर्गत हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील ९ वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते २६ वर्षापर्यंतच्या व त्यापुढील अविवाहित महिला यांच्यासाठी एचपीव्ही लसीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिला दिनी झालेल्या या लसीकरण शुभारंभ कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ते म्हणाले, एचपीव्ही लस घेतलेल्या मुलींना कोणताही त्रास होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने या संदर्भात सुरक्षित लस म्हणून मान्यता दिलेली आहे. यामुळे न घाबरता गर्भाशय कर्करोग टाळण्यासाठी ही लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., यशोमंगल चॅरीटेबल ट्रस्टच्या डॉ.राधिका जोशी, आरोग्य संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या अमरीन मुश्रीफ, शीतल फराकटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महिला दिनानिमित्त बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्या देशात महिलांना बरोबरीचे स्थान दिले आहे त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे असे सांगून आपल्याकडेही महिलांना प्रत्येक क्षेत्रात सोबत घेऊन जाण्याची गरज आहे असे सांगितले. डॉ.राधिका जोशी यांनी या लसीबाबत कोणताही गैरसमज करण्याची गरज नसल्याचे सांगितले. मुलींच्या लसीकरणावेळी सोबत येणाऱ्या महिलांची एचपीव्ही चाचणी करण्यासाठीही आम्ही पुढे नियोजन करीत आहे. यातून हे विषाणू कोणा महिलेत आढळून आल्यास त्यांच्यावरतीही वेळेत उपचार करता येतील अशा त्या म्हणाल्या. डॉ. अजय चंदनवाले यांनी दरवर्षी गर्भाशय कर्करोगाने 1.5 लाख महीला बाधित होत असल्याचे सांगितले. एचपीव्ही लसीकरणामुळे शरीरावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. मुलींनी वृद्धपकाळात चांगले जीवन जगण्यासाठी ही लस आत्ता घ्यावी असे आवानही त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आत्तापर्यंत झालेल्या आरोग्यविषयक कार्यक्रमांमधील हा कार्यक्रम सर्वोच्च आणि महत्वाचा असल्याचे सांगितले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी या विषयाबाबत केलेला पाठपुरावा आणि संकल्पपुर्तीचा कालावधी पाहता हे एक आदर्शवत उदाहरण असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हयातील सर्व पात्र मुली व युवतींना ही लस आवर्जून घेण्याचे आवाहन करून हा संकल्प 100 टक्के यशस्वी करुया असे आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी त्यांनी केलेल्या प्रशिक्षणादरम्यानच्या अभ्यासाचा दाखला देत एकुण 100 महिलांमागे 30 महिलांना गर्भाशयाबाबत अडचणी असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक भैया माने यांनी केले. ते म्हणाले, डी.आर.माने महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभारी आहे. आठ ते दहा हजार रूपयांना मिळणारी ही लस मोफत सर्वांना दिली जात आहे. हा चांगला उपक्रम असून याची नोंद इतिहासात सोनेरी आक्षरात लिहली जाईल. शितल फराकटे यांनी मुलींना जीवदान देण्याचे कार्य या उपक्रमातून घडत असून गोर गरिब गरजू मुलींना ऐन संकटात मदत करणारा हा उपक्रम असल्याचे सांगितले. या कार्यक्रमावेळी लस दिलेल्या मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच महिला दिनानिमित्त कागल तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सन्मानही करण्यात आला.
*डॉ. राधिका जोशी यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा*
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील यशोमंगल चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. राधिका जोशी यांनी कॅन्सरमुक्तीसाठी केलेले काम अलौकिक आहे. १९८० सालापासून महिलांमधील कॅन्सरविषयी जनजागृती व कॅन्सरमुक्तीचे काम त्या करीत आहेत. त्या स्वतः एचपीव्ही प्रतिबंधक लस अनेक वर्षापासून मुलींना देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार ज्या ज्या महिलांनी ही लस घेतले आहे त्यांना कॅन्सर झालेला नाही. त्यांच्या या अफाट कार्याची नोंद घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला पाहिजे, अशी मागणीही मंत्री यांनी केली.