डी.वाय.पी अभियांत्रिकीच्या रायगड किल्ल्यावर आधारित एआर-व्हीआर सादरीकरणाची शासनाकडून प्रशंसा

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग विभागातील विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्यावर आधारित ऑगमेंटेड रिऑलिटी आणि व्हर्च्युअल रिऑलिटी (एआर-व्हीआर) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला प्रकल्पाची महाराष्ट्र शासनाकडून प्रशंसा करण्यात आली आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अत्याधुनिक माध्यमांतून सादर करण्याच्या या प्रयत्नांचे कौतुक करत शासनाकडून प्रशंसा पत्र देण्यात आले आहे.
शिवरायांचा पराक्रम, राज्यकारभार हा सर्वांसाठीचा प्रेरणादायी आहे. त्यामुळेच किल्ला तयार करणे हा मुलांचा आवडता उपक्रम. दगड-मातीपासून किल्ले बांधणाऱ्या विद्यार्थ्यानी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हि आवड पुढे नेली आहे. त्यांनी युनिटी हब आणि इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने रायगड किल्ल्याची डिजिटल पुनर्रचना केली आहे. विशेषतः विकलांग आणि वृद्ध व्यक्तींना किल्ल्याचा संपूर्ण अनुभव डिजिटल स्वरूपात घेता यावा, यासाठी व्हर्च्युअल टूरची सोय केली आहे. १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३९५ व्या शिवजयंतीचे औचित्य साधून या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्याला राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी राजवीर पृथ्वीराज देसाई, अनिरुद्ध अनिल घाटगे आणि प्रियांका प्रसाद उत्तुरे या विद्यार्थ्यांनी डॉ. तन्वी राहुल पाटील आणि विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम केला आहे.
या प्रकल्पामध्ये थ्री डी मॉडेल्स, इंटरॅक्टिव्ह अनुभव आणि व्हर्च्युअल टूरचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी पेटंट आणि कॉपीराइटसाठी अर्ज दाखल करण्यात आला असून, या संशोधनावर आधारित शोधनिबंध एप्रिलमध्ये होणाऱ्या आयईईई पुणेकॉन या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील विचारांचे आणि आधुनिक पद्धतीने गड किल्य्यांचा इतिहास मांडण्याच्या उपक्रमाचे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून कौतुक करण्यात आले आहे. या विभागचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत प्रशंसा पत्र लिहिले आहे. हे पत्र संस्थेचे विश्वस्त ऋतुराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज संजय पाटील,विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी हा प्रकल्प सादर करणाऱ्या टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.