कळंबा कारागृहातील गांजा रॅकेटचा पर्दाफाश
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
कोल्हापूरात 'कुंपन'च शेत खाते' अशी घटना कळंबा कारागृहात घडली आहे. कैद्यांना गांजा पुरवणाऱ्या कारागॄहातील सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड याला रंगेहात पकडले. या कारवाईत अडीच किलो गांजा आणि रोख पन्नास हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले आहेत.
कळंबा कारागृहात मुंबईसह राज्यभरातील कैदी आहेत. यातील अनेक कैदी गांजाचे व्यसनी असून गेल्या वर्षभरात गांजा आणि मोबाईल कारागृहात सापडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यादृष्टीने कारागृह प्रशासनाने कळंबा कारागृहात गांजा कुठून येतो याची शोध मोहीम सुरू केली होती. गुरुवारी २७ रोजी सकाळी साडेसात वाजता कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीमध्ये बदल झाल्यावर कारागृहात ड्युटीसाठी प्रवेश करताना कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता बाळासाहेब भाऊ गेंड या सुभेदाराकडे १७१ ग्रॅम गांजा आढळून आला.
कारागृहाची शिपाई महेश दिलीप देवकाते यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुभेदार गेंडच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता अडीच किलो गांजा आणि रोख पन्नास हजार पाचशे रुपये त्याच्या घरातून हस्तगत करण्यात आले.पोलिसांनी गेंड याला अटक करून कोर्टापुढे हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.