क्रिकेटच्या देवाचा 52 वा वाढदिवस , 16 व्या वर्षीच केले होते डेब्यू , अशी आहे कारकीर्द

क्रिकेटच्या देवाचा 52 वा वाढदिवस , 16 व्या वर्षीच केले होते डेब्यू , अशी आहे कारकीर्द

मुंबई :  क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आज आपला ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. एक सामान्य मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आपल्या असामान्य खेळाने भारताच्या आणि जागतिक क्रिकेटच्या इतिहासात प्रसिद्ध झाला.

सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे कवी तर आई रजनी तेंडुलकर विमा कंपनीत कर्मचारी होत्या. बालपणापासूनच क्रिकेटची प्रचंड आवड असलेल्या सचिनने मुंबईच्या गल्ल्यांमध्ये खेळत खेळत आपल्या कौशल्याला धार दिली.

१६ व्या वर्षी पदार्पण 

सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ रोजी केवळ १६ व्या वर्षी कराचीत पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. काही आठवड्यांनंतर १८ डिसेंबर १९८९ रोजी त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही प्रवेश केला. त्यानंतर त्याची कारकीर्द एका झंझावातासारखी वाढत गेली.

त्याने २०० कसोटी सामने, १५,९२१ कसोटी धावा, ५१ कसोटी शतके, आणि ४९ एकदिवसीय शतके अशी अद्वितीय कामगिरी केली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) तो मुंबई इंडियन्सकडून खेळला आणि संघाला अनेक विजय मिळवून दिले.

२४ वर्षांची  प्रदीर्घ कारकिर्द

१६ नोव्हेंबर २०१३ रोजी, २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर, सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. क्रिकेटच्या बाहेरही सचिनने आपल्या अस्तित्वाची छाप सोडली आहे. तो आजही अनेक मोठ्या ब्रँड्सचा चेहरा आहे आणि दरवर्षी २०-२२ कोटी रुपयांची कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती १२५० कोटींच्या घरात आहे.

व्यवसायिक क्षेत्रातही त्याने पाय रोवले आहेत. त्याचा कपड्यांचा ब्रँड True Blue २०१६ मध्ये लाँच झाला असून तो आता अमेरिका आणि इंग्लंडमध्येही पोहोचला आहे. मुंबई आणि बंगळुरूमध्ये त्याची “Sachin’s” आणि “Tendulkar’s” ही रेस्टॉरंट्सही चालतात. आजचा दिवस केवळ वाढदिवसाचा नाही, तर एका महान खेळाडूच्या यशाचा आणि प्रेरणादायी वाटचालीचा सन्मान करण्याचा दिवस आहे.