खगोलशास्त्राच्या आकाशातले दीप मालवले: जयंत नारळीकर अनंतात विलीन

पुणे: भारताच्या खगोलशास्त्र क्षेत्रातील दैदिप्यमान तारा आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर यांचे आज वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी, पहाटे झोपेतच त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे विज्ञान, शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. नारळीकर यांना कोणताही दीर्घ आजार नव्हता. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचेही निधन झाले होते.
वैज्ञानिक, शिक्षक, लेखक - एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व
१९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे जन्मलेले जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसीत, तर पुढील उच्च शिक्षण ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात झाले. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर, हेही ख्यातनाम गणितज्ञ होते आणि आई सुमती नारळीकर संस्कृत विदुषी होत्या.
खगोलशास्त्रातील आपल्या क्रांतिकारी संशोधनामुळे डॉ. नारळीकर यांना जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासोबत अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण केले.
'आयुका' संस्थेची निर्मिती आणि विज्ञानप्रसाराचे योगदान
१९८८ मध्ये पुण्यात "आयुका" (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या आंतरविद्यापीठीय केंद्राची स्थापना त्यांनी केली आणि पहिले संचालक म्हणून नेतृत्व केले. ही संस्था आज भारतात खगोलशास्त्राच्या शिक्षण आणि संशोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
साहित्य व विज्ञानाचा संगम
डॉ. नारळीकर हे मराठी आणि इंग्रजीतील विज्ञानलेखक म्हणूनही ओळखले जात. त्यांनी विज्ञानकथा, लघुनिबंध आणि शैक्षणिक पुस्तके लिहून विज्ञानप्रसाराला नवे आयाम दिले. नाशिक येथे पार पडलेल्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
पुरस्कार आणि सन्मान
त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या विचारसंपन्न लेखन, संशोधन आणि शिक्षणकार्याद्वारे विज्ञानाची ज्योत घराघरात नेली. भारतीय विज्ञानजगतातील एक तेजस्वी तारा आज कायमचा नजरेआड झाला असला, तरी त्यांच्या कार्याची प्रकाशरेखा सदैव मार्गदर्शक ठरेल.