गगनबावडा तालुक्यात सर्वत्र मुसळधार,भुईबावडा, करूळ घाटात दरड कोसळली

गगनबावडा तालुक्यात सर्वत्र मुसळधार,भुईबावडा, करूळ घाटात दरड कोसळली
गगनबावडा तालुक्यात सर्वत्र मुसळधार,भुईबावडा, करूळ घाटात दरड कोसळली

रोहन भिऊंगडे / प्रतिनिधी :  

गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच असून संततधारेमुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे. पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भुईबावडा, तिरवडेमधील लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे.

तालुक्यात आतापर्यंत १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. दरडीचा अधिकत्तर भाग गटारात कोसळला असला तरी काही दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

दरड कोसळल्याचे समजताच बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घाटात पोहोचले. त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात रस्ता वाहतुकीस खुला केला. याशिवाय, घाटमार्गात अन्य काही ठिकाणी देखील छोटे मोठे दगड रस्त्यावर कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटात देखील काही दगड रस्त्याकडेला कोसळले. मात्र, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्यातील शुक, शांती, अरूणा, कुसुर, करूळ, गोठणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भुईबावडा परिसरात पावसाचा जोर अधिक असून या गावातील घाणेगडवाडी येथील लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय तिरवडे येथे देखील कॉजवेवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.