विधानसभेला महिला कर्मचाऱ्यांना सोयीस्कर नेमणूक देण्याची मागणी

विधानसभेला महिला कर्मचाऱ्यांना सोयीस्कर नेमणूक देण्याची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीत महिला शिक्षिकांना कार्यरत ठिकाण परिसरात निवडणूक आदेश द्यावेत; अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे, 'दिव्यांग शिक्षक-शिक्षिका, स्तनदा माता, गरोदर माता, ५५ वर्षांवरील सर्व शिक्षक, आजारग्रस्त शिक्षक या सर्वांना निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात यावे. महिला शिक्षकांना त्या कार्यरत असलेल्या ठिकाणाहून पाच किलोमीटरच्या आत निवडणूक आदेश लागू करावेत. दिवाळी सुटीदरम्यान निवडणूक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येऊ नये. दिवाळी सुटीपूर्वी एक व दिवाळी सुटीनंतर दुसरे प्रशिक्षण घ्यावे. मुख्याध्यापकपदी कार्यरत असणाऱ्या महिलांना केंद्राध्यक्षपदी नेमणूक देऊ नये.

यावेळी निवडणूक अधिकारी शेंडगे यांनी निवडणुकीत महिलांना सोयीचे आदेश देण्याची ग्वाही दिली. शिष्टमंडळात शिक्षक नेते राजाराम वरुटे, कोषाध्यक्ष संभाजी बापट, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर यांचा समावेश होता