जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आमदार प्रकाश आबिटकर घेणार जनतेचा आशीर्वाद – नंदकुमार ढेंगे
गारगोटी (प्रतिनिधी) : आमदार प्रकाश आबिटकर यांना गेली 10 वर्षामध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघावर असलेल्या मागस शिक्का पुसून मतदार संघाला विकसीत करण्यात यश आले असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीपुर्वी मतदार संघातील नागरीकांचे आशिर्वाद घेण्यासाठी मंगळवार, 22 ऑक्टोंबर पासून पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील छोटी गावे, वाड्या-वस्त्यांपासून आमदार प्रकाश आबिटकर जनआशिर्वाद यात्रा सुरू करणार असल्याची माहिती शिवसेना समन्वयक व गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, मतदार संघातील गावांची संख्या लक्षात घेता मतदार संघातील रस्ते, पाण्याचे प्रकल्प, शासकीय कार्यालय, रुग्णालय यासह विविध पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यास आमदार आबिटकर यांचे सर्वोतोपरी प्राधान्य राहिले आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास, उद्योग, क्रीडा सुविधांची निर्मिती आदींच्या माध्यमातून शाश्वत विकासाला बळकटी देण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी गेली 10 वर्षात केलेल्या प्रत्येक कार्यात सर्वसमावेशक जनतेची साथ मोलाची ठरलेली आहे. या यात्रेच्या निमित्याने आमदार आबिटकर निवडणूकीपुर्वी हे मतदार संघातील छोटी गावे व वाड्या-वस्त्यांवर जाऊन येथील नागरीकांशी संवाद साधत त्यांचा आशिर्वाद घेणार आहेत. त्यांनी केलेल्या मतदार संघातील विकासाचे चक्र अबाधित राखण्यास याच विकासकामांच्या जोरावर ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. मतदार संघाच्या विकासाला अधिक बळकटी, गती व नवी दिशा देण्याकरिता एक व्हिजन व नियोजित कृती कार्यक्रम घेऊन जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी ते मंगळवार, 22 ऑक्टोंबर पासून जनसंवाद यात्रा सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.