मोठी बातमी!जपानी संस्था ‘निहॉन हिदानक्यो’ला शांततेचा नोबेल पुरस्कार

मोठी बातमी!जपानी संस्था ‘निहॉन हिदानक्यो’ला शांततेचा नोबेल पुरस्कार

नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू असताना आज शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार जपानमधील 'निहॉन हिदानक्यो' या संस्थेला देण्यात आला आहे, अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत दिली. ही संस्था हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्ब हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी कार्यरत आहे.

'निहॉन हिदानक्यो' ही संस्था अण्वस्त्रांच्या वापराविरोधात जागतिक पातळीवर काम करत आहे. या संस्थेचा प्रमुख उद्देश जगाला अण्वस्त्र मुक्त करण्याचा आहे. हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यांमध्ये पीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी मोठं योगदान देणाऱ्या या संस्थेच्या कार्याचा गौरव करण्यासाठी यंदा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

नोबेल पुरस्कार समितीने सांगितलं की, निहॉन हिदानक्योने अनेक दशकांपासून अण्वस्त्र पीडितांच्या न्यायासाठी काम करत जगभरातील सरकारांना अण्वस्त्र नष्ट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे जागतिक शांततेसाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.