श्री एकवीरा यात्रेनिमित्त पालखी मंडळांची लोणावळा पोलीस ठाणे येथे नियोजन बैठक संपन्न
श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट वेहेरगाव आयोजित चैत्र सप्तमी १५ एप्रिल या मुख्य दिवशी कार्ला गडावर होणाऱ्या आई श्री एकवीरा देवी पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असून दि. १४ ते १६ एप्रिल या दोन दिवशी देवीची यात्रा आहे. यात्रेला आगरी, कोळी, कराडी, कुणबी, सी.के.पी. व इतर समाजातील लाखो भक्त व भाविक दर्शनासाठी येतात. पालखी व यात्रेचे औचित्यसाधून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व एकविरा पालखी मंडळे व मंडळाचे प्रमुख यांची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. नियोजन बैठक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे बैठक संपन्न झाली.
यंदा प्रथमच सर्व एकविरा पालख्यांच्या प्रमुखांना एकत्र आणण्याचे काम एकवीरा भक्त जयेंद्रदादा खुणे (अध्यक्ष मुंबई प्रदेश, आगरी सेना ) यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवर श्री.सुरेंद्रदादा पाटील (उद्योजक) , छावा क्रांतिवीर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. रोशनदादा पवार, कोळी समाजाचे श्री.चंदू पाटील, आई एकविरा देवी भक्त मंडळ अलिबाग अध्यक्ष विशाल डवळे व इतर उपस्थित होते.
गडावर शोभेची दारू व फटाके वाजवण्यास बंदी करण्यात आलेली आहे, येणाऱ्या सर्व पालखी मंडळांनी दुपारी एक वाजण्याच्या अगोदर येणे आवश्यक आहे. सर्व पालख्या मंडळांची विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गडावर कचरा, घाण करू नये व स्वच्छता राखावी, तसेच भांडण, तंटा, वाद, होऊन शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये. पालखी सोहळ्याला व आईचे दर्शन घेणाऱ्या सर्व भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत दर्शन घ्यावे. पायथा ते एकविरा गडावर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत. भक्तांनी पोलीस व स्वयंसेवक यांना सहकार्य करावे. तसंच श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व कर्मचारी यांच्याशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये तसेच हुल्लडबाजी करून इतर भाविकांना व नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. मोठ्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था अग्रसेन हॉटेलच्या बाजूला करण्यात आलेली आहे.या अटी व नियमांचे सर्व पालखी प्रमुखांनी स्वागत करून सहकार्य करण्याचे व पालखी सोहळा आनंदात व उत्साहात त्याचप्रमाणे पारंपारिक पद्धतीने केला जाईल अशी जबाबदारी पालखी प्रमुखांनी स्वीकारली. अशाप्रकारे ही नियोजन बैठक संपन्न झाली.