इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला, इस्रायल-लेबनान तणाव वाढला
वृत्तसंस्था: हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याच्या हत्येनंतर, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी युद्ध थांबवण्याची तयारी दाखवली होती, पण रॉयटर्सच्या बातमीनुसार त्यांच्या सिझेरिया शहरातील खासगी निवासस्थानाला ड्रोनने लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यावेळी नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी घरी उपस्थित नव्हते, त्यामुळे कुणीही जखमी झाले नाही. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली.
या हल्ल्यानंतर राजधानी तेल अविवमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसेच लेबनानमधून डागलेले दोन अन्य ड्रोन इस्रायलच्या हवाई दलाने हाणून पाडले आहेत. याह्या सिनवार याच्या हत्येच्या दोन दिवसांनंतर लेबनानकडून ड्रोन हल्ला झाल्याचे मानले जात आहे. हा हल्ला तणावात अधिकच भर घालणारा ठरला असून, इस्रायल आणि लेबनानमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.