शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ?

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये चर्चेला नवा रंग दिला आहे. काल शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जयंत पाटलांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, असे संकेत दिले. या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली असून, घटक पक्ष ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी या विधानावर तातडीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राज्यात महायुती सरकारला सत्तेतून हटवण्यासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. शरद पवारांच्या जयंत पाटलांना जबाबदारी दिल्याच्या संकेतामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
या संदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "शरद पवारांनी असे संकेत दिले असतील तर त्यावर चर्चा केली जाईल. मात्र, शरद पवार साधारणपणे अशा प्रकारचे संकेत देत नाहीत. पूर्वी त्यांनी रोहित पवारांना मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती, पण एका पक्षात दोन मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत." त्यांनी पुढे सांगितले की, "सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावांचीही चर्चा झाली होती. त्यामुळे पाच सहा लोक मुख्यमंत्री कसे होऊ शकतात?" राऊतांच्या या प्रश्नाने महाविकास आघाडीतील तणाव अधिकच उघड झाला आहे.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत असताना, शरद पवारांच्या जयंत पाटलांवरील विधानामुळे आगामी निवडणुकीत आघाडीची रणनीती काय असेल, याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.