गडहिंग्लज मध्ये संजीवनी कृषी प्रदर्शनास प्रारंभ

गडहिंग्लज प्रतिनिधी : येथील संजीवनी महिला कृषी विकास व बहुउद्देशीय संस्था, राज इव्हेंट, किसान एक्झिबिशन सोसायटी, कृषी विभाग व गडहिंग्लज नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारअखेर सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू असणारे हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
शनिवारी (४) सायंकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यांनी काही स्टॉलना भेट देऊन प्रदर्शनाचे विशेष कौतुक केले. याठिकाणी विविध प्रकारचे १५० स्टॉल मांडण्यात आले आहेत. मुश्रीफ म्हणाले, गेल्या २८ वर्षांपासून राज्यस्तरीय अनेक कृषी प्रदर्शने भरवून शेतकरी व संबंधित सर्वांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्याचा गडहिंग्लज विभागातील अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा.
प्रदर्शनात शेती अवजारे, बी- बियाणे, खते, जलसिंचन पद्धती, दुग्धव्यवसाय, मत्स्योत्पादन, अन्न प्रक्रिया व साठवणूक, पॅकेजिंग पद्धती, नर्सरी, टिश्यू कल्चर, कृषी व्यवस्थापन, शेती अर्थ पुरवठा, इन्शुरन्स यासंदर्भात तज्ज्ञांकडून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येत आहे. संयोजक राज डावरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, पृथ्वीराज पाटील, महेश सलवादे, संतोष चिक्कोडे, प्रशांत शिंदे, राहुल शिरकोळे, आण्णासाहेब देवगोंडा, विनोद बिलावर आदी उपस्थित होते