डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. 

 शिक्षण क्षेत्राबरोबरच, कृषी, बांधकाम, हॉटेल, रिटेल, सहकार अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉ. संजय डी. पाटील यांचा 61 वा वाढदिवस १८ फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी ३.३० वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, आमदार सतेज (बंटी) डी. पाटील, ऋतुराज संजय पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 

या समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. कैलाश सत्यार्थी हे बालमजुरीविरोधात लढा देणारे समाजसेवक असून जागतिक पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सत्यार्थी प्रथमच कोल्हापुरात येत असून त्यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. 

या समारंभात डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ‘डॉ. संजय डी. पाटील गौरव ग्रंथा’चे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर डॉ. कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ‘ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन’ ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.