गोकुळच्या दूध संकलनात ३० हजार लिटरची वाढ - नविद मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गोकुळच्या दूध संकलनात ३० हजार लिटरची वाढ झाली आहे. जून २०२४ मध्ये १४ लाख ७० हजार लिटर इतके दूध संकलन होते. जून २०२५ मध्ये दूध संकलन सरासरी प्रतिदिन १५ लाख लिटरवर पोहोचले आहे. गोकुळच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वासरू संगोपन, जातिवंत म्हैस खरेदी, मुक्त गोठा प्रोत्साहन योजना आदी योजनांचे है फलित असल्याचे गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सांगितले.
वाढीव दूध संकलनात १० हजार लिटर म्हैस व २० हजार लिटर गाय दुधाचा आहे. आकडेवारीनुसार गोकुळमध्ये दूध संकलनामध्ये करवीर तालुक्याचा प्रथम क्रमांक लागतो. या तालुक्यातून दोन ते सव्वादोन लाख लिटर दू प्रतिदिनी संकलित होते, म्हैस दुश संकलनातही करवीर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यातून ७० हजार ते १ लाख लिटर म्हैस दुधाचे तर गायीच्या दुधाचे दीड लाख लिटर संकलन होते. राधानगरी, कागल, पन्हाळा, शिरोळ, चंदगड, भुदरगड या तालुक्यांतून प्रतिदिन एक ते दीड लाख लिटर दुधाचे संकलन केले जाते.
गोकुळच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या वासरू संगोपन योजनेला मिळणारा प्रतिसाद, तसेच परराज्यातून खरेदी केलेल्या जातिवंत म्हैशींमुळे यावर्षीचे गोकुळचे संकलन १५ लाख लिटर स्थिर राहिले आहे. यावर्षी वीस लाख लिटरच्या संकलनाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करू, असे गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले.