जिल्ह्यात एड्सने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत संख्या घट - जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - एचआयव्ही संसर्गित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, समुपदेशन व औषधोपचारातील सातत्यामुळे जिल्ह्यात एड्सने मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असून ही समाधानाची बाब आहे. यापुढेही एचआयव्ही संसर्गित रुग्णांना इतर कोणत्याही संधिसाधू आजारांचा संसर्ग होऊ नये, तसेच संसर्गित व्यक्तीकडून इतरांना लागण होऊ नये हा दृष्टिकोन ठेवून काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहुजी सभागृहात संपन्न झाली. एच.आय.व्ही.बाबत युवा विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडून जागृती होण्याच्या उद्देशाने सर्व महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन करण्याच्या सुचना देवून जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, एच.आय.व्ही. संसर्गित रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबर एच.आय.व्ही च्या जोखमीची ठिकाणे शोधून याठिकाणी एचआयव्ही तपासणीचे काम वाढवा. सर्व गरोदर महिलांची एचआयव्ही चाचणी पहिल्या तिमाहीतच करुन घ्या. तृतीयपंथी व्यक्तींनी आपल्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नोंदणी करावी. सर्वसामान्य नागरीकांना त्रास होवू नये यासाठी सेक्स वर्कर महिलांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देवून ईएमटीसीटी कार्यक्रमांतर्गत माता व बालकांना दिल्या गेलेल्या उपचारांमुळे मागील दोन वर्षात एचआयव्ही संसर्गित मातांची बालके निरोगी असल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच एच.आय.व्ही, टीबी समन्वय कामाचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी आकडेवारीसह एचआयव्ही एड्सच्या जिल्ह्यातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले. जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय मुलांसाठी क्विझ, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रेड रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांनी आभार मानले.
यावेळी सीपीआर हॉस्पिटलच्या बाह्य संपर्क अधिकारी डॉ. रेश्मा पवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गिरीश कांबळे, क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अमरसिंह पोवार, महिला बाल विकास विभागाचे महेंद्र कांबळे, आरटीओ इन्स्पेक्टर हिना सौदागर, एआरटी सेंटर्सचे वैद्यकीय अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रकल्प प्रमुख , सुरक्षा क्लिनिक, लिंक एआरटी सेंटरचे समुपदेशक उपस्थित होते.