जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्टचे गायमुखावर १० ते १३ एप्रिल अखेर रौप्य महोत्सवी अन्नछत्रचे आयोजन

जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहजसेवा ट्रस्टचे गायमुखावर १०  ते १३ एप्रिल अखेर रौप्य महोत्सवी अन्नछत्रचे आयोजन

कोल्हापूर : सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राची सुरुवात होऊन आज दोन तपे होऊन गेली. २००१ साली ४५ ते ५० वर्षाचे तरुण आज ७० च्या पलीकडे गेलेले आहेत.  पण आजही २००१ च्या जिद्दीने व पुढील पिढीच्या हातात हात घालून या वर्षाचे अन्नछत्र पहिल्याच उत्साहाने चालू आहे आणि चालू राहणार आहे. यावर्षी २५ वे  अन्नछत्र येत्या १० ते १३ एप्रिल अखेर आयोजित केले आहे अशी माहिती सहज सेवा ट्रस्टचे संमती मिरजे, प्रमोद पाटील, चिंतन शहा, मनीष पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवरूप सूर्यकांत गायकवाड,रोहित गायकवाड,सुनील कुंभार उपस्थित होते.

२००१ सालातल्या चैत्र महिन्यातील ज्योतिबा यात्रेत म्हणजेच आजपासून २५ वर्षांपूर्वी सहज भावनेतून, समाजातील संवेदनशील व्यक्तींनी एकत्र येऊन सुरू केलेला सहजसेवा ट्रस्ट आज रौप्य महोत्सव साजरा करत आहे. 

महाराष्ट्र मध्ये देव देवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख यात्री करून मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी भाविक डोंगरावर येतात .यात्रेसाठी येणाऱ्या जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली २४ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालवण्यात येते. 

प्रति वर्षाप्रमाणे यंदाही हे अन्नछत्र दि. १० ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये दिवस व रात्र चालू राहणार आहे. मागील वर्षी झालेली गर्दी, तसेच मागील वर्षापासून  शासनाने व पोलीस प्रशासनाने चार चाकी वाहनांचा तळ अन्नछत्राच्या शेजारी म्हणजेच गायमुखावर केलेला असल्यामुळे अन्नछत्राच्या ठिकाणीच जवळजवळ दोन हजार चार चाकी वाहनांमधून येणारा भक्तगण हा अन्नछत्राचा नक्कीच लाभ घेणार आहेत. त्यामुळे यावर्षी दोन लाखावर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. असे यावेळी संयोजकांनी सांगितले.