कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात ; उपमुख्यमंत्री पवार देतील का अखेरची संधी..?

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वादग्रस्त विधानं करणारे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे आता विधान परिषदेत अधिवेशन चालू असताना रमी खेळल्याने नव्या वादात अडकले आहेत. या प्रकारानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख अजित पवार यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री कोकाटेंना एक अखेरची संधी देण्याच्या विचारात आहेत. त्यांच्या कामगिरीत सुधारणा करणे आणि वादांपासून दूर राहणे या अटींवर त्यांना तात्पुरते संरक्षण दिलं जाऊ शकतं. कृषी विभागाच्या कामाचा आढावा घेताना, विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी कोकाटे यांच्या कार्यपद्धतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचंही सांगण्यात आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कामगिरी अहवालात कोकाटे यांचा कृषी विभाग पहिल्या पाच स्थानांमध्ये होता. या कालावधीत अनेक नव्या योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री कोकाटे यांच्या कामगिरीचं कौतुक केलं असलं तरी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मंत्री कोकाटे यांनी कृषी खात्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून खर्च कमी करत उत्पादन वाढवण्याच्या अनेक संकल्पना अंमलात आणल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ पोहोचला आहे. विशेष म्हणजे, आयएएस अधिकारी व्ही. राधा यांना सचिव म्हणून नेमण्याची मागणी करणारे मंत्री कोकाटे हे एकमेव मंत्री असल्याचंही प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. बहुतेक मंत्र्यांना राधा यांच्यासारखे कडक शिस्तीचे अधिकारी नकोसे वाटतात, पण मंत्री कोकाटे यांना मात्र अशा अधिकाऱ्यांची साथ हवी आहे.
मंत्री कोकाटे यांच्या कार्यकाळात जवळपास १.२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ४६ हजार कोटी रुपये थेट जमा झाले आहेत. यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेचं कौतुकही केलं जात आहे. मात्र, वादग्रस्त विधानांमुळे त्यांचं कार्यकौशल्य झाकोळलं गेलं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात मंत्री कोकाटे यांच्या रूपाने नव्या नेतृत्वाची बांधणी करत आहेत. अशा वेळी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतल्यास ते विरोधकांच्या दबावाला बळी पडल्यासारखं दिसेल. विशेषतः दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या वादग्रस्त मंत्र्यांना समर्थन देत असताना, मंत्री कोकाटेंवर कारवाई केल्यास पक्षात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असंही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं.