देवकर पाणंद ते कळंबा साई मंदिर रस्ता आयडीयल रोड म्हणून विकसित करणार : आ. अमल महाडिक
कोल्हापूर : देवकर पाणंद चौकातून तपोवन मैदान मार्गे कळंब्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याशिवाय धुळीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीची दखल घेत आमदार अमल महाडिक यांनी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर यांच्यासह या रस्त्याची पाहणी केली. हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्याचा मनोदय आमदार महाडिक यांनी व्यक्त केला.
केवळ डांबरीकरण न करता रस्त्याच्या दुतर्फा रुंद फुटपाथ, सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटर्स, नागरिकांना बसण्यासाठी बेंच आणि वृक्षारोपण करून एक आयडियल रोड बनवण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना महाडिक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. तपोवन मैदानावर सकाळी आणि संध्याकाळी फिरणाऱ्यांची मोठी गर्दी असते. या लोकांना या रस्त्याचा वापर करता येईल. तसेच वसंत विश्वास पार्क शेजारून आयटीआय कडे जाणारा रस्ताही अशाच पद्धतीने विकसित केला जाईल असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मोठे आणि महत्त्वाचे रस्ते अशा पद्धतीने विकसित केल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. लवकरच महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली जाईल असे महाडिक यांनी सांगितले.
यावेळी विनय खोपडे, संग्राम पाटील सुधीर राणे, निलेश निकम, विश्वेश कुलकर्णी, अरुण कोपर्डीकर, अजित साळुंखे, शांतीकुमार शेटे, जालंदर सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.