भारताचे ऑपरेशन यशस्वी; DGMO स्तरावर पुन्हा चर्चा होणार

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (१० मे) अधिकृत शस्त्रसंधी करण्यात आली. मात्र काही तासांतच पाकिस्तानने कराराचे उल्लंघन करत पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले. त्यामुळे सीमेवरील तणाव कायम असून सध्या "तणावपूर्ण शांतता" निर्माण झाली आहे.
रविवारी भारतीय लष्कराचे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (DGMO) लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी माध्यमांना ऑपरेशन सिंदूर आणि मागील चार दिवसांतील घडामोडींचा आढावा दिला. त्यांनी स्पष्ट केले की भारताच्या आक्रमक कृतीमुळे पाकिस्तानला शस्त्रसंधीची विनंती करावी लागली.
राजीव घई यांनी सांगितले की, सर्वप्रथम पाकिस्तानी DGMO यांनी हॉटलाइनवरून संपर्क साधला आणि युद्धबंदीबाबत चर्चा झाली. आज पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या DGMO स्तरावर चर्चा होणार आहे. त्यानंतर भारत आपली पुढील रणनीती ठरवणार आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 6-7 मे च्या रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. यानंतर पाकिस्तानने प्रतिहल्ला केला, परंतु भारताने सर्व हल्ले परतवून लावत 9 मे रोजी हवाई हल्ला आणि 10 मे रोजी तोफगोळ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
या घडामोडीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि नंतर भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. पाकिस्तान चर्चेसाठी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली.
भारताने मात्र स्पष्ट केले की, ही चर्चा फक्त DGMO स्तरावरच होईल. त्यानुसार, 10 मे रोजी दुपारी 3.30 वाजता भारत-पाकिस्तान DGMO मध्ये संवाद झाला आणि पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली. भारताचा उद्देश पूर्ण झाल्यामुळे भारताने ती शस्त्रसंधी मान्य केली.
यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीची माहिती जगाला दिली. लगेचच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत देशाला याची अधिकृत माहिती दिली.