पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे 'सुपर स्वच्छ लीग' मध्ये देशपातळीवर यश ; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2024 - 25 च्या 'सुपर स्वच्छ लीग' विशेष श्रेणीत पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदने यश मिळविले आहे. पन्हाळा शहराचा 17 जुलै रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा पुरस्कार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आणि पाणीपुरवठा अभियंता प्रिया तारळेकर यांनी स्विकारला. देशांतर्गत स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2024 - 25 चे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात पन्हाळा नगरपरिषदेने सुपर स्वच्छ लीग श्रेणीत पुन्हा एकदा दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
कचरामुक्त आणि हगणदारीमुक्त शहर यांसारख्या विविध घटकांमध्ये पन्हाळा शहराने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पन्हाळ्याने देशात स्वच्छतेचा एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. शहराने केवळ स्वच्छता राखली नाही, तर देशपातळीवर मापदंड बनविला आहे.
लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांचे सहकार्य -
सर्व लोकप्रतिनिधी, शहरातील नागरिक, पन्हाळा नगरपरिषद प्रशासन, अधिकारी, कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण सहकार्य हे या यशामागील मुख्य कारण आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा सहआयुक्त नागेंद्र मुतकेकर, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या यशात समावेश आहे. या गौरवास्पद कामगिरीबद्दल सर्व स्तरातून पन्हाळा पालिकेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
पन्हाळ्याचे ऐतिहासिक यश...
स्वच्छ सर्वेक्षण 2024 - 25 मध्ये 'सुपर स्वच्छ लीग' ही एक नवी आणि महत्त्वपूर्ण श्रेणी समाविष्ट करण्यात आली होती. मागील तीन म्हणजे सन 2021, 2022, 2023 या सलग तीन वर्षांत स्वच्छतेमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक शहरांसाठी ही श्रेणी सुरु करण्यात आली होती. या 'लीग' मध्ये आपले स्थान टिकवण्यासाठी किमान 85 टक्के गुण मिळणे आवश्यक होते. पन्हाळा शहराने हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करत 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून आपले स्थान बळकट केले. यापूर्वी देखील पन्हाळ्याने स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशपातळीवर 46 वा, 2020 मध्ये 5 वा, 2021 मध्ये 8 वा, 2022 मध्ये 10 वा आणि 2023 मध्ये 8 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच शहरास सलग 6 वर्षे ODF++ मानांकन प्राप्त झाले आहे.