परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन : वेतन त्रुटी आणि कंत्राटी भरतीविरोधात तीव्र संताप

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, मुख्यालय लातूर आणि शाखा कोल्हापूर यांच्या वतीने परिचारिका संवर्गाच्या ज्वलंत मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. वेतनातील सातव्या वेतन आयोगातील त्रुटी आणि पुन्हा सुरू करण्यात आलेल्या कंत्राटी भरती प्रक्रियेचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे.
संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी या त्रुटींविषयी निवेदने दिली, तसेच न्यायालयात दाद मागितली. यानंतर शासनाने खुल्लर समिती गठित केली. या समितीसमोर पुन्हा सादरीकरण करण्यात आले तरीही वेतनातील अन्याय कायम आहे. त्यामुळे परिचारिका संवर्गात तीव्र नाराजी आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या -
अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिर्देशिका या पदांवरील वेतन त्रुटी तात्काळ दूर कराव्यात. कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करून कायमस्वरूपी पदभरती सुरू करावी. ५० हून अधिक रिक्त पदे पदोन्नतीद्वारे त्वरित भरावीत. ४० वर्षांपासून प्रलंबित असलेले भत्ते मंजूर करावेत. अन्य प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य कराव्यात.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूरसोबत इतर समविचारी संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला होता.