पैशाच्या वादातून नातवाने आजीला संपवले
कोल्हापूर : पैशांच्या वादातून नातवाने मित्रांच्या मदतीने ८२ वर्षीय आजीचा खून करून तिचे दागिने लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहे.
गणेश राजाराम चौगले (वय २२, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने आपल्या मित्र नरेश ऊर्फ नरेंद्र दगडू करपे (वय २५, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) व एका अल्पवयीन आरोपीच्या मदतीने हा गुन्हा केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.
पाटल्या, कर्णफुले असे चार तोळे सोने घेऊन नातू पसार
गणेशने आपल्या आजीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, आजीने त्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या गणेशने आपल्या मित्रांसह कट रचून काल दुपारी आजीच्या घरी जाऊन तिचा गळा दाबला व डोक्यावर आघात करून खून केला. त्यानंतर तिच्या पाटल्या, कर्णफुले असे चार तोळे सोने घेऊन दरवाजाला बाहेरून कुलूप लावून तिघे पसार झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश व त्याच्या मित्रांचा शोध घेऊन त्यांना रात्रीच अटक केली. अधिक तपास इचलकरंजी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.