प्रतिष्ठित हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल अफेअर्स सेल आणि हम्बोल्ट अकॅडमी (पुणे चॅप्टर) व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.-उषा योजनेच्या माध्यमातून उद्या, शुक्रवारी (दि. ७) 'अलेक्झांडर वॉन हम्बोल्ड्ट पोस्टडॉक्टरल फेलोशिप' या प्रतिष्ठित फेलोशिपच्या अनुषंगाने मार्दर्शन करण्यासाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. भौतिकशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत हा परिसंवाद होणार आहे. ही माहिती बायोटेक्नॉलॉजी आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे संचालक डॉ. किरणकुमार शर्मा आणि इंटरनॅशनल अफेअर सेलचे संचालक डॉ. एस. डी. सादळे यांनी दिली आहे.
शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांतील नुकत्याच पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या, पीएच.डी. शोधप्रबंध जमा केलेल्या आणि पीएच.डी. करीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या परिसंवादाचा लाभ होणार आहे. हम्बोल्ट फेलोशिप प्राप्त केलेले अनेक तज्ज्ञ संशोधक आजघडीला विविध राष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यांमधील निवडक तज्ज्ञ संशोधक परिसंवादात मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादात, हम्बोल्ट फेलोशिपची आवेदन पद्धती, त्याचे निकष आणि मुख्यत्वे त्यासाठीचा प्रस्तावलेखन या संदर्भात मार्गदर्शन केले जाईल.
परिसंवादासाठी उपस्थित संशोधकांना आपल्या रिसर्च प्रपोजलचे पोस्टर प्रेझेंटेशन करण्याचीही संधी दिली जाणार आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या निवडक संशोधन प्रकल्पांसाठी हम्बोल्ट फेलोशिपसाठी प्रपोजल रायटिंगचे मार्गदर्शनही या तज्ज्ञांकडून देण्यात येईल.
विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील अधिकाधिक संशोधक विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी केले आहे.