भारताला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना बळकटी देणारा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प - आमदार अमल महाडिक

कोल्हापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वच घटकांना उभारी देणारा आहे. शेतकरी कष्टकरी वर्ग, मजूर, कारखानदार, महिला आणि विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध करून देणाऱ्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. राज्यभरात सुरू असलेली विविध विकास कामे अव्याहतपणे सुरू राहतील याची ग्वाही या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भातील विरोधकांनी पसरवलेले सर्व गैरसमज खोडून काढणारा हा अर्थसंकल्प आहे. राज्याचे नवीन औद्योगिक धोरण राबवताना पाच वर्षांच्या कालावधीत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पन्नास लाख रोजगार निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. मुंबई महानगर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रोथ हब विकसित करण्याबरोबरच दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातही स्टील हब उभारण्यात येणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि अपारंपारिक ऊर्जेच्या वापरांवर दिलेला भर यामुळे येणाऱ्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये मोठी बचत होणार आहे. महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांसाठी 8400 कोटी रुपयांचा शोअर प्रकल्प आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 30100 कोटींचा नवा प्रकल्प संकल्पित आहे. महानगरांमधील मेट्रो प्रकल्प आणि नवीन विमानतळांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्यामुळे विकास गतिमान होणार आहे. एसटी महामंडळाकडील 6000 डिझेल बसेसचे सीएनजी आणि एलएनजी बसेस मध्ये रूपांतरण त्याचबरोबर नवीन बस खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार असल्यामुळे लाल परी ची चाके गतिमान होणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेबरोबरच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवण्याचा निर्णय नक्कीच पथदर्शी आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवण्यात येणार आहे.
एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या विकसित भारताच्या स्वप्नाला बळकटी देणारा हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल.
महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही अशा भावनेतून सादर झालेला आजचा अर्थसंकल्प नक्कीच महाराष्ट्राला नवी दिशा देणारा आहे. हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!