मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला ; सभेतच अजित पवार भडकले
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी सातत्याने दिल्या जाणाऱया निवेदनांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, सालगडी केले का मला ? या शब्दात अजित पवार उपस्थितांवर भडकले. मेडद येथे बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या नूतन पेट्रोलपंपाचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत पवार बोलत असताना उपस्थितांतून त्यांना सातत्याने वेगवेगळ्या विषयाची निवेदने येत होती. त्यातून भाषणात व्यत्यय येत होता. त्यावर पवार यांनी मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला अशा शब्दात उपस्थितांना सुनावले.
पवार मेडदमध्ये भाषण करत असताना काही लोक निवेदन देत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदने वाचत अधिकाऱ्यांना बोलावून ही कामे हाता वेगळी करत होते व अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करत होते. याच दरम्यान एका कार्यकर्त्याने बरीच महिने झाले हे काम झाले नाही असा धोशा लावला. त्यानंतर दुसऱ्याही कार्यकर्त्याने त्याच्या सुरात सुर मिसळला. हे पाहून पवार यांनी "तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला" असे अजित पवार म्हणाले आणि पुन्हा शांतता पसरली.