आपल्या पराभवाला ईव्हीएम नाही आपणच जबाबदार : अमित ठाकरे

मुंबई : ‘निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले, तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे स्पष्ट मत आहे,’ असे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईत पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार असेल असे पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचे मत असेल तर ते सिद्ध करून दाखवा, असे आवाहनही त्यांनी केल्याचे समजते. त्यामुळे अमित ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेलाच छेद दिल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीतील पराभवानंतर अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच या बैठकीच्या निमित्ताने ही कबुली दिली.
विधानसभा निवडणुकीतील मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केले आहे. परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही. मतदान कुठेतरी गायब झाले, असे नमूद करीत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकाल अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त केले होते. अशा प्रकारे निवडणुका होणार असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या,’ असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख ईव्हीएम यंत्रणेकडे असल्याचे बोलले जाते. मात्र आता अमित ठाकरे यांनी वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसते.
निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी अमित ठाकरे यांनी पराभवासाठी आपणच जबाबदार असल्याचे सांगितल्याचे समजते. यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रणेस दोष देण्याचा प्रयत्न केला, त्यावर अमित यांनी हे आव्हान दिले. विधानसभा निवडणुकीत मला अतिआत्मविश्वास नडला, मतदारसंघात अवघ्या १५ दिवसांत घरोघरी पोहोचू शकलो नाही, अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडणाऱ्या विभाग अध्यक्षांनाही अमित यांनी खडे बोल सुनावल्याचे समजते. पदाची जबाबदारी पेलवत नसेल तर पदाचा राजीनामा द्या आणि ज्यांना काम करायचे आहे त्यांना संधी द्या, असे त्यांनी सांगितल्याचे कळते.