मराठी चित्रपसृष्टीच्या ८०च्या दशकातील "हँडसम हंक" सापडला मृतावस्थेत.. अभिनेत्याच्या अशा जाण्यानं बसला सर्वांनाच धक्का..

मराठी चित्रपसृष्टीच्या ८०च्या दशकातील "हँडसम हंक" सापडला मृतावस्थेत.. अभिनेत्याच्या अशा जाण्यानं बसला सर्वांनाच धक्का..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठी चित्रपसृष्टीचे ८०च्या दशकातील हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे.पुण्यातील मावळ तालुक्यामधील आंबी येथे एका बंद खोलीत रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला.

गेल्या काही दिवसांपासून ते मावळ तालुक्यातील आंबी येथे एकटेच राहत होते. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

टॅक्सी ड्रायव्हर ते प्रसिद्ध अभिनेता असा खडतर प्रवास..

रवींद्र महाजनी हे मूळचे बेळगावचे.त्यांचे वडील ह. रा. महाजनी नावाजलेले पत्रकार होते. ते मुंबईला स्थायिक झाल्यानंतर त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड लागली. त्यानंतर ते शाळेत असल्यापासून नाटकात, चित्रपटात आणि शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घेत असत. खालसा महाविद्यालयामध्ये बी. ए. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेते रविंद्र महाजनी यांनी अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते काही वर्षे टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही त्यांनी काम केलं.

त्यानंतर रवींद्र महाजनी यांना मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना पहिली संधी मिळाली.हे नाटक व्ही. शांताराम यांनी पाहिल्यानंतर त्यांनी १९७५ मध्ये झूंज चित्रपटात महत्वाच्या भूमिकेची संधी दिली.

देखणेपण, रुबाबदार आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले.१९७५ ते १९९० चा काळात ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. "मुंबईचा फौजदार" आणि देवता हे त्यांचे चित्रपट खूपच गाजले.रवींद्र माहाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली.

लक्ष्मीची पावलं, देवता, गोंधळात गोंधळ, बेलभंडार, अपराध,मीच केला, काय राव तुम्ही, असे अनेक चित्रपट खूपच गाजले. त्यानंतर त्यांनी बॉलीवूड आणि गुजराती सिनेमांमध्येही काम केले.

अशा या ८०च्या दशक गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या अशा अवस्थेत आढळल्यामुळे सर्वानाच धक्का बसलाय.