शरदमध्ये शिक्षणासोबत शिस्त, नम्रता, स्विकारार्हतेचे धडे : जोशॉ डेव्हिड

शरदमध्ये शिक्षणासोबत शिस्त, नम्रता, स्विकारार्हतेचे धडे : जोशॉ डेव्हिड

यड्राव : "शरद इन्स्टिट्युटमध्ये ज्ञान, तांत्रिक कौशल्यासोबत शिस्त, नम्रता, स्विकारार्हता, अनुकुलनीय असे अनेक धडे दिले जातात. या सर्वाचा भविष्यात आपल्या करिअर व वैयक्तिक जीवनात उपयोगी पडतात. तुम्ही स्वत: चांगले बना संपूर्ण विश्व तुमच्यासाठी चांगले बनेल. त्यासाठी स्वत:पासून सुरवात करा, असे प्रतिपादन एम्पासिस कंपनीचे इडिया कॅम्पस हेड जोशॉ डेव्हिड यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनात बोलत होते. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते. 

डेव्हिड पुढे म्हणाले, करिअरसाठी आयटी हे एकच क्षेत्र नाही, तर इतर क्षेत्राचा विस्तार खूप मोठा आहे. त्यामध्येही करिअर आहे. विद्यार्थ्यांनी ह्या इतर क्षेत्राचाही विचार करायला हवा. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रासह इतर क्षेत्रातील ज्ञान अवगत करा. तुम्ही ह्या कॉलेजचे भविष्यातील ब्रँड अम्बॅसिटर आहात. त्यामुळे जगात वावरताना या सर्व संस्काराचे अनुकरण करा. 

अनिल बागणे म्हणाले, ग्रामिण व सर्वसाधारण परिस्थितीतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताला काम, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती होण्याच्या उद्देशाने हि संस्था काम करीत आहे. शिक्षण, कौशल्यासोबत संस्कार, शिस्तीचे धडे देत आहोत. आमचा विद्यार्थी निर्व्यसनी, स्वाभिमानी, निर्भिड व अन्यायाच्या विरुध्द लढणारा असा सक्षम नागरीक बनविण्याचे आमचे ध्येय आहे.  

प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारीतोषिक वितरण झाले. यामध्ये गुणवंत्त विद्यार्थी, क्रिडासह विविध स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सुमित माणगांवे याचा सन्मान करण्यात आला. 

दरम्यान दोन दिवसांमध्ये पारंपरिकदिन, रेकॉर्ड व पेपर फिशपॉन्ड, रांगोळी, मेहंदी, पाककला, सॅलेड डेकोरेशन यासह क्रिकेट, हॉलीबॉल, कब्बडी, खो-खो, अथलेटीक्स, बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबलटेनिस विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले.

सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. एस.आर. घोरपडे, प्रा. य़ु.एस. पाटील, सर्व डिन, सर्व विभागप्रमुख यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. स्वागत विधी फराटे हिने केले. सूत्रसंचालन प्रशस्ती करंदीकर, अंजली वर्मा यांनी केले. आभार प्रा. धनश्री बिरादार यांनी मानले.