गोकुळ मार्फत यूपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व गुणवंतांचा सत्कार

गोकुळ मार्फत यूपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी व गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर -  कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यू.पी.एस.सी.) घेण्यात आलेल्या २०२४ नागरी सेवा परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील दिलीपकुमार कृष्णा देसाई रा.जांभूळवाडी, ता.गडहिंग्लज, हेमराज हिंदुराव पनोरेकर रा.बालिंगा, ता.करवीर यांनी यश संपादन केल्याबद्दल व संजय घोडावत विद्यापीठातून प्रतिक्षा रणजीत लंबे रा.शिरोली दु.ता.करवीर यांनी मास्टर ऑफ सायन्स या विभागातून मेडिसिनल केमिस्ट्री या विषयात गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तसेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुलदीप बापुसो पाटील रा.बेले/राशिवडे खु. यांनी अहिल्यानगर कर्जत जामखेड येथे झालेल्या ७० किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलेबद्दल त्यांचा सत्कार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हणाले की, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अपार कष्ट व जिद्दीच्या जोरावरती यु.पी.एस.सी. परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थांनी यश संपादन केल्यामुळे कोल्हापूरचे नाव देश पातळीवर उज्वल झाले आहे, याचा निश्चितच गोकुळला अभिमान आहे. गोकुळ दूध संघ हा नेहमीच अश्या व्यक्तीच्या पाठीशी उभा असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुले मुली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवत आहेत. उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी संघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सत्काराला उत्तर देताना दिलीपकुमार देसाई म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य आणि माझ्या कोल्हापूर भूमितील गोकुळ दूध संघात होणारा माझा सत्कार हा माझ्यासाठी अभिमानास्पद व ग्रामीण भागातील तरुणासाठी प्रेरणादायी आहे. 

यावेळी प्रतिभाताई पवार महिला दूध संस्था पोर्ले तर्फ ठाणे या संस्थेने संघास म्हैस व गाय जास्तीत जास्त दूध पुरवठा महिला संस्था द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल संघातर्फे सत्‍कार करण्यात आला. तसेच गोकुळ दुध संघाचे माजी संचालक स्वर्गीय विजय उर्फ बाबा देसाई यांना व जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना गोकुळ परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी संघाचे ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच सत्कारमूर्तीच्या कुटुंबातील सदस्य, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.