यशासाठी चिकाटी, धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

कोल्हापूर : विद्यार्थिनींनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, धैर्य आणि आत्मविश्वास हे गुण अंगी बाणवावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहाच्या 'होस्टेल डे' कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी हॉस्टेल डेच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार यांनीही मार्गदर्शन केले.
वसतिगृहाच्या मुख्य अधीक्षक डॉ. माधुरी वाळवेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अधिक्षक डॉ. कविता वड्राळे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. मीना पोतदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. नीलांबरी जगताप यांच्यासह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.