'या' कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवमतदारांना मतदानाचा हक्क नाही मिळणार

'या' कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नवमतदारांना मतदानाचा हक्क नाही मिळणार

मुंबई - राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तब्बल सात लाख नवमतदारांनी नोंदणी केली असली, तरी त्यांना यंदा मतदानाचा हक्क मिळणार नाही. कारण नियमानुसार, या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीतील अंतिम मतदारयादीच वापरण्यात येणार आहे.

राज्यात महापालिका, नगर परिषद आणि जिल्हा परिषदा अशा प्रलंबित स्थानिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचालींना वेग दिला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आयोगाने निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू केली असून, कर्मचारी प्रशिक्षणापासून ते यंत्रणांच्या नियोजनापर्यंत कामाला गती आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेली अंतिम मतदारयादी मागवली आहे. हीच यादी स्थानिक निवडणुकांमध्ये वापरली जाणार असून, सध्या ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी एकूण मतदारसंख्या ९ कोटी ७३ लाख होती, जी आता वाढून सुमारे ९ कोटी ८० लाखांवर गेली आहे. मात्र, यामध्ये अलीकडेच नोंदणी केलेल्या सुमारे ७ लाख नवमतदारांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.