येत्या ५ वर्षांत अमेरिका - भारत देशांमधील व्यापार दुप्पट होईल : पीएम मोदी

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांना संबोधित केले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "येत्या ५ वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट होईल.", "२०३० पर्यंत आमचा द्विपक्षीय व्यापार दुप्पटहून अधिक वाढवून ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे."
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, आमची टीम लवकरच व्यापार करारावर काम करेल. ज्याचा दोन्ही देशांना फायदा होईल. भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही तेल आणि वायू व्यापार मजबूत करू. ज्यामुळे ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढेल. उभय देशांच्या करारामुळे नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणांचा फायदाही होणार असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारताच्या संरक्षण बांधणीत अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावते. धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून, आम्ही संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाकडे सक्रियपणे वाटचाल करत आहोत. नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे आपल्या क्षमता वाढवतील.
यावेळी या बैठकीला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल हे उपस्थित होते.