वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गोळीबार ; एकाचा मृत्यू , एकजण जखमी

वाढदिवसाच्या कार्यक्रमातच गोळीबार ; एकाचा मृत्यू , एकजण जखमी

पुणे : मारामारी, गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. त्यातच पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून मोठी बातमी समोर येत आहे.  देहू रोड इथल्या आंबेडकरनगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात एकाच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्रीचे साधारण अकरा ते साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत  आहे.

विक्रम गुरुस्वामी रेड्डी (वय ३७) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून नंदकिशोर यादव (वय ४०) यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव शाबीर समीर शेख असल्याची माहिती जखमी यादव यांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय ? 

या घटनेविषयी मिळालेली माहिती अशी की, देहूरोड येथील आंबेडकर नगर भागात वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात एक सराईत गुन्हेगार आला आणि त्याने "वाढदिवस करताय?" म्हणत आपल्याकडील पिस्तूल काढत गोळीबार करण्यास सुरुवात केली.

या गोळीबारात विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचा जागेवर मृत्यू झाला असून नंदकिशोर यादव हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातवरण निर्माण झाले असून एकच खळबळ उडाली आहे.

विक्रम रेड्डी हे तेलगू कन्नडा संगम देहू रोड उपाध्यक्ष रमेश रेड्डी यांचे धाकटे बंधू असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत.