रंकाळ्याला गतवैभव प्राप्त करून देण्यास नेहमीच प्रयत्नशील : आम. जयश्री जाधव
कोल्हापूर :प्रतिनिधी
रंकाळा तलावाच्या मूळ स्वरूपास कोणताही बदल न करता तलावाच्या सुशोभीकरणाचे व संवर्धनाचे काम झालेच पाहिजे. याबाबत लवकरच पुरातत्व विभागसोबत बैठक घेतली जाईल. आमदार जयश्री जाधव यांनी आज रंकाळा तलावास भेट देऊन मनपा प्रशासन व ठेकेदार यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. यामध्ये नागरिक व पर्यटक यांच्या सोयीसुविधांचा व सुचनांचा विचार झाला पाहिजे अशा सूचना त्यांनी महापालिका प्रशासन व ठेकेदारांना दिल्या.
आमदार जाधव यांनी रंकाळा टॉवरच्या भिंतीचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जावळच्या गणपती बाजूच्या रस्त्यालगत वॉकिंग ट्रॅक करण्याची गरजच काय होती. या वॉकिंग ट्रॅकमुळे वाहतुकीला अडथळा येत असून वाहतूक वारंवार ठप्प होत आहे. गरज नसलेल्या या वॉकिंग ट्रॅक बद्दल प्रशासनाने फेरविचार करावा. तसेच याभागात असणारे शौचालय नागरिकांसाठी खुले करावे अशी सूचना आमदार जाधव यांनी यावेळी दिली.
रंकाळाच्या सभोवतीच्या वॉकिंग ट्रॅकची रुंदी वाढवण्यात यावी अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली. ऐतिहासिक रंकाळ्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच सध्या सुरू असलेले काम उच्च दर्जाचे आणि गुणवत्ता पूर्ण झालेच पाहिजे. या कामाच्या दर्जाबाबत तक्रार आल्यास हे काम स्वतः बंद पाडू असा इशाराही आमदार जाधव यांनी यावेळी दिला.
यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक विक्रम जरग, प्रताप जाधव, इंद्रजीत बोंद्रे, अजय इंगवले, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, प्रवीन लिमकर, पप्पू नलवडे, सुरज जाधव, रणजीत निकम, शहर अभियंता हर्षजीत घाटगे आदी उपस्थित होते.