रांगड्या मातीतील हळव्या प्रेमाची कथा मांडणारा ‘गाभ’ 21 जूनला चित्रपटगृहात
रांगड्या मातीतील हळव्या प्रेमाची कथा मांडणारा अनुप जत्राटकर लिखित - दिग्दर्शित ‘गाभ’ चित्रपट 21 जूनला चित्रपटगृहात दाखल होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी पडद्यावर येत आहे. ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे असून सुमन गोटुरे आणि मंगेश गोटुरे या चित्रपटाचे निर्माते आहेत. अनुप जत्राटकर माहितीपट,लघुपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीशी संबंधित आहेतच पण आता गाभ हा आगळा वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत.
मनुष्य आणि प्राणी यांना केंद्रस्थानी ठेवून ‘गाभ’ चित्रपटाची कथा मांडली आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करते. या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका अभिनेता कैलास वाघमारे यांनी आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारली आहे. स्वत:च्या म्हशीसाठी एका रेड्याचा शोध घेताना माणूस म्हणून होणारा बदल आणि त्या बदलाची कथा हळव्या प्रेमाच्या माध्यमातून दाखवणारा गावच्या रांगड्या मातीतला हा ‘गाभ’ चित्रपट आहे.
‘गाभ’चित्रपटात कैलास वाघमारे, सायली बांदकर, विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत. छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांनी या चित्रपटातील गाण्यांना स्वरसाज चढवला असून येत्या 21 जून हा चित्रपट प्रेक्षकांना पहावयाला मिळणार आहे.