गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधक एच. पी. व्ही. लसीकरणासाठी तयारी करूया : आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी : महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजेच सर्वाइकल कॅन्सर या गंभीर आजाराशी सामना करावा लागतो. स्वाभाविकताच; त्यांचे संपूर्ण आयुष्यच धोक्यात येते. दरम्यान; गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी विवाहपूर्वीच जर लस दिली तर कॅन्सर होतच नाही, हे आता जगात सिद्ध झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ ते २६ या वयोगटातील मुली व महिलांना एच. पी. व्ही. प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यासाठी नियोजन आरोग्य विभागाची बैठक झाली. साधारणता आठ मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्यावर या मोहिमेला सुरुवात होऊन सहा एप्रिलपर्यंत ही मोहीम राबविली जाणार असल्याच्यादृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामाजिक बांधिलकीतून हे शिवधनुष्य उचलले आहे.
कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरोग्य विभागासह शिक्षण व इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ वर्षावरील आणि २६ वर्षापर्यंतच्या अडीच लाखाहून अधिक अविवाहित मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर प्रतिबंधक मोफत लसीकरण करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. बाजारात साधारणता दोन हजार रुपये किंमत असलेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक म्हणजेच एच. पी. व्ही. ही लस विविध कंपन्यांचा सीएसआर फंड, दानशूर व्यक्ती, संस्था यांच्या माध्यमातून मोफत दिली जाणार आहे.
बैठकीत बोलताना आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डाॅ. दिलीप माने म्हणाले, महिलांची गर्भाशयाच्या कॅन्सर या दुर्धर आजारातून सुटका करण्यासाठी आणि त्यांचे जीवन आनंदी होण्यासाठी ही प्रभावी लस आहे. नऊ ते २६ वयोगटातील मुली व महिलांनी स्वतःहून पुढे येऊन या लसीसाठी नावनोंदणी करावी.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, एच. पी. व्ही. या गर्भाशयाच्या कॅन्सर प्रतिबंधक लसीने महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतच नाही, हे आता संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे म्हणाले, शाळा शिकणाऱ्या व शाळाबाह्य मुलींनासुद्धा ही लस देण्यासाठी नियोजन करूया.
या बैठकीत मुंबईच्या जी. टी. हॉस्पिटलचे मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डाॅ. शेगावकर, नागपूरच्या दिवीशा संस्थेचे समन्वयक डॉ. गिरीश चरडे, पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजचे डॉ. इब्राहिम अन्सारी यांचीही मनोगती झाली.
*पालकांची संमती, समुपदेशन व जनजागृती......!*
भारतात दर आठ मिनिटाला एक महिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू पावत आहे. त्यावर प्रभावी इलाज म्हणून जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली व भारतातच तयार झालेली ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्रतिबंधक लस आहे. ही लस घेण्यासाठी पालकांची संमती, पालकांसह मुली-तरुणींचे समुपदेशन व जनजागृती करण्यावर भर देण्याबाबतही चर्चा झाली. विविध शाळा, हायस्कूल, महाविद्यालयांसह इतर माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे.