राधानगरीत के पीं ची मशाल पेटली असून तिच्या उजेडात 'प्रकाश' पडणार : संजय पवार

राधानगरीत के पीं ची मशाल पेटली असून तिच्या उजेडात 'प्रकाश' पडणार : संजय पवार

राधानगरी (प्रतिनिधी) : शिवसेनेची धगधगती मशाल आता माजी आमदार के पी पाटील यांच्या हातात असून या राधानगरीत पेटलेल्या मशालीच्या उजेडात 'प्रकाश' पडणारच असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केला. 

धामोड येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आबिटकरांना खास बाब म्हणून वारेमाप निधी दिला असताना मातोश्रीशी ५० खोक्यांच्या मोहापायी यांनी गद्दारी केली. ज्यांना निवडून देण्यासाठी राधानगरीच्या जनतेने आणि आम्ही जातिवंत शिवसैनिकांनी कष्ट घेतले तेच गद्दार आबिटकर राज्यात खुर्चीसाठी सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा भाग झाले हे राधानगरीच्या स्वाभीमानी जनतेला आवडलेले नाही. म्हणूनच त्यांना पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिली मशाल या राधानगरी मतदारसंघात पेटविली आहे. कमिशन मधून गोळा केलेल्या बक्कळ पैशाच्या जीवावर मतदार विकत घेण्याची त्यांची भाषा सुरू असून केवळ ठेकेदारी, टक्केवारी आणि भागीदारीवर यांचे प्रेम आहे."

जिल्हा उपनेते विजय देवणे म्हणाले," आबिटकर हे स्वतःला जर पाणीवाला बाबा समजत असतील तर मग या मतदारसंघातील मेघोली धरण कशामुळे फुटले? राधानगरी मतदार संघातील अनेक धरणे व बंधाऱ्यांच्या गळतीचा प्रश्नही गेल्या दहा वर्षांत ते सोडवू शकलेले नाहीत. आधी या प्रश्नांची उत्तरे जनतेला द्या आणि मगच निवडणुकीला सामोरे जा."

यावेळी वसंत पाटील- गुरुजी, पी डी धुंदरे, सदाशिवराव चरापले,सचिन घोरपडे धैर्यशील पाटील- कौलवकर, संजयसिंह पाटील आदींसह धामोड परिसरातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी हिंदवी स्वराज्य ग्रुपने माजी आमदार के पी पाटील यांना पाठिंबा दिल्याची घोषणा ग्रुपचे अध्यक्ष योगेश मोरे यांनी केली.

*नाव प्रकाश .... खरं काय दिवे लावले?* 

के पी पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यमान आमदारांच्या नावावर कोटी केली. ते म्हणाले,"विद्यमान आमदार महोदयांचे नाव प्रकाश आहे; परंतु गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघात त्यांनी काय दिवे लावले ? असा प्रश्न राधानगरीच्या जनतेच्या मनात असून आमच्या शिवसेनेच्या मशालीच्या उजेडात 'प्रकाश' पडणार हे इथल्या जनतेनेच ठरविले आहे."