राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)  प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा बदल घडून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आता शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला. यापूर्वी या पदावर जयंत पाटील कार्यरत होते. त्यांचा राजीनामा दिल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती, मात्र जयंत पाटील यांनी हे वृत्त फेटाळले होते. तरीही, पक्षात नेतृत्वबदलाची चर्चा सुरूच होती आणि अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

जयंत पाटील 2018 पासून सात वर्षे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यावर लगेच संपूर्ण राज्याचा दौरा केला आणि पक्ष संघटनेची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटन मजबूत राहिलं आणि त्यांच्या कार्यकाळात पक्षाने त्यांना मुदतवाढ देखील दिली होती. आता मात्र पक्षात नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय झाला आहे.

शशिकांत शिंदे कोण आहेत? 

शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते माथाडी कामगार संघटनांमध्ये प्रभावशाली नेतृत्व करत आले आहेत. 1999 मध्ये त्यांनी जावळी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर कोरेगाव आणि जावळी या दोन्ही मतदारसंघांतून त्यांनी दोन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा अनुभव आहे.

2009 ते 2014 या काळात कोरेगावचे आमदार असताना त्यांनी शालिनीताई पाटील यांना पराभूत केले होते. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लढा दिला होता, मात्र थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला. त्याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता.

सध्या शशिकांत शिंदे विधान परिषदेचे आमदार असून, पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी निभावत आहेत. पवार गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात फूट झाल्यानंतरही शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या निष्ठेची आणि संघटन क्षमतेची दखल घेत पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.