अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवर ; मुख्यमंत्री फडणविसांनी राजीनामा घेतला पाहिजे : संजय राऊत

अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवर ; मुख्यमंत्री फडणविसांनी राजीनामा घेतला पाहिजे : संजय राऊत

नवी दिल्ली: सुरेश धस यांच्यापूर्वी अनेकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एका मंत्र्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवर आहे. नैतिकनपोटी कोणतीही खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवारांनी नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  

इतका मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. अंजली दमानिया , सुरेश धस आरोप करत आहेत. माणिक कोकाटे यांच्यासंदर्भात तर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. विधानसभा अध्यक्षांवर निर्णय काय सोडताय, ते निष्पक्ष आहेत का? आमच्या १२ आमदारांच्या मुद्यावेळी आम्ही पाहिलं, ते काय निष्पक्ष राहून निर्णय घेणार आहेत का? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला. 

सुरेश धसांवर  आता कोणी विश्वास ठेवणार नाही : संजय राऊत

सुरेश धस यांच्यावर कोणी आता विश्वास ठेवेल असं वाटत नाही. त्यांचा बुरखा फाटला आहे. तरीही ते अजूनही मैदानात लढण्याचं नाटक करत असतील तर त्यांनी ते करत राहावं. त्यांनी ज्याप्रकारे मुंडेंची भेट घेतली. ज्याक्षणी मुंडे आले तेव्हाच त्यांनी बाहेर यायला हवं होतं आणि सांगायला हवं होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला पण मी खंबीर आहे.