स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत जाणून घ्या 'ही' मोठी अपडेट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत  जाणून घ्या 'ही' मोठी अपडेट

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी ही नित्याची बाब झाली आहे. गेल्या काही वर्षांतल्या राजकीय उलथापालथींनी हे पुन्हा पुन्हा सिद्ध केलं आहे. आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग कोणत्याही क्षणी फुंकलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो वा महायुती सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

युती की आघाडी? पक्षांमध्ये रणनीतीवर मंथन - 

या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये आणि गटांमध्ये आतापासूनच पडद्यामागे घमासान हालचाली सुरू आहेत. पक्षीय पातळीवर युती करायची की स्वतंत्र लढायचं? यावरही विचार सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणत्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

निवडणुकांचा खोळंबा आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश - 

राज्यात अनेक महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते पाच वर्षांपासून प्रशासकीय नियंत्रणात आहेत. कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीमुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, सुप्रीम कोर्टाने २०२२ पूर्वीचं ओबीसी आरक्षण कायम ठेवत, निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे.

चार टप्प्यांमध्ये निवडणुका? वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता - 

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांमध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. सध्या प्रभागरचनेचं काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच निवडणूक आयोगाकडून अधिकृत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप निवडणुका चार टप्प्यांत घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

जनतेचा मूड कोणता? महायुती की मविआ? - 

या निवडणुका राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं होतं, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून राज्यातील जनतेचा खरा मूड काय आहे, हे स्पष्ट होईल. महायुतीला पुन्हा एकदा बहुमत मिळणार का? की महाविकास आघाडी कमबॅक करणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.