पवन कल्याण यांनी बॉलिवूडबाबत केलेलं 'हे' वक्तव्य चर्चेत

मुंबई - तेलुगू सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सध्या त्यांच्या बॉलिवूडविषयक विधानांमुळे चर्चेत आहेत. दक्षिणेतील चित्रपटसृष्टी भारतीय संस्कृतीशी अधिक नातं राखते, तर बॉलिवूड अधिक व्यावसायिक आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करणारा झाला आहे, असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान पवन कल्याण यांनी 'भारतीय सिनेमा' या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "भारतीय सिनेमा" हा एकसंध विचार नाकारत, त्यांनी प्रत्येक प्रादेशिक चित्रपटसृष्टीने आपापल्या परीनं मौल्यवान योगदान दिलं असल्याचं म्हटलं.
बॉलिवूडबाबत बोलताना पवन कल्याण पुढे म्हणाले, हिंदी सिनेमांनी भारतीय संस्कृतीशी असलेली नाळ काहीशी तोडली आहे. आजचा बॉलिवूड हा व्यवसायाभिमुख झाला असून, पैशाच्या मागे लागल्यामुळे त्याच्या कथांमध्ये सांस्कृतिक मूल्यांची कमतरता जाणवते. प्रत्येक काळात वेगवेगळ्या पिढ्यांनी चित्रपटांची निर्मिती केली, मात्र विशेषतः हिंदी सिनेमात सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या पात्रांची कधीकधी थट्टा केली जाते, ही गोष्ट खेदजनक आहे.
पवन कल्याण यांच्या मते, सध्याच्या काळात दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्री भारतीय संस्कृतीचं जास्त प्रभावीपणे प्रतिनिधित्व करत आहे. ते म्हणाले, “हिंदी चित्रपटांमध्ये देखील पूर्वी असं चित्र होतं. उदाहरणादाखल ‘दंगल’ सारखा चित्रपट घ्यावा तो केवळ यशस्वीच नव्हता, तर भारतीय मूल्यांशी जुळलेला होता. पण अशा प्रकारचे चित्रपट आता दुर्मिळ झाले आहेत.”
दरम्यान, पवन कल्याण यांचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘हरि हर वीरा मल्लू’ हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, ‘दे कॉल हिम ओजी’ हा चित्रपट यंदा २५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.