स्मार्ट मीटर पोस्टपेड बाबत आ. सतेज पाटलांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

स्मार्ट मीटर पोस्टपेड बाबत आ. सतेज पाटलांच्या तारांकित  प्रश्नाला मुख्यमंत्र्यांचे उत्तर

कोल्हापूर  प्रतिनिधी : सद्यस्थितीत प्रीपेड पद्धतीने वीज मीटर बसणार येत नसून ग्राहकांना स्मार्ट मीटर पोस्टपेड पद्धतीनेच बसवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

केंद्र सरकारने वीज देयकं थकवणाऱ्या आणि वीज चोरी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट प्रीपेड वीज मीटर योजना कार्यान्वित केली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २७ हजार कोटी रुपयांची कामे विविध कंपन्यांना दिली. मात्र राज्यभरातील ग्राहक संघटना, वीज कामगार संघटना आणि राजकीय पक्षांनी या योजनेच्या विरोधात आंदोलने पुकारली. त्यानंतर सामान्य वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवले जाणार नसल्याची घोषणा तत्कालीन ऊर्जामंत्र्यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये केली होती. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच वापरात असलेले मीटर सुरू ठेवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सद्यस्थितीत प्रीपेड पद्धतीने वीज मीटर बसवण्यात येत नाहीत. ग्राहकांना स्मार्ट मीटर पोस्ट पेड पद्धतीने बसण्यात येणार आहेत. हे मीटर प्रथम महावितरणच्या विविध प्रणालींमध्ये बसवण्यात येत आहेत. त्यानंतर शासकीय कार्यालय, शासकीय वसाहती, औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना तसेच नवीन वीज जोडणीकरिता बसवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.