“आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी"या ग्रंथाचे प्रकाशन

“आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी"या ग्रंथाचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डॉ. प्रथमेश कोटगी व डॉ. समीर जोशी लिखित"आयुर्वेद सर्वसामान्यांसाठी " भाग १ व २’ या ग्रंथांचा प्रकाशन समारंभ नुकताच फोंडा-गोवा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात आयुर्वेदाचे गूढ, शास्त्रीय व तात्त्विक ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत सहज आणि सरळ भाषेत पोहोचवण्याचा हेतू मांडण्यात आला.

या पुस्तकाचे लेखक डॉ. प्रथमेश कोटगी (सहाय्यक प्राध्यापक, स्वस्थवृत्त विभाग, कै. केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय, गडहिंग्लज) आणि डॉ. समीर जोशी (सहयोगी प्राध्यापक, संहिता व सिद्धांत विभाग, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय, ढवळी - फोंडा) यांनी आपले अनुभव, शास्त्रीय अभ्यास आणि समाजहिताचा दृष्टिकोन या ग्रंथांमधून मांडला आहे.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, तसेच गोमंतक आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. अनुरा बाळे आणि प्रकाशक प्रियंका जोशी उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात आयुर्वेद शिक्षणाचे महत्त्व, जीवनशैली सुधारण्याचे तत्त्वज्ञान आणि या पुस्तकाच्या उपयुक्ततेबाबत मनोगत व्यक्त केले. "आरोग्य हेच खरे संपत्तिमान जीवन असून, आयुर्वेद त्याचे सर्वोत्तम साधन आहे", असा संदेश आपल्या मनोगतातून दिला.

पुस्तकात अग्नी, दोष, धातू, ऋतुचर्या, आहारविज्ञान व सामान्य व्याधींवरील आयुर्वेदीय उपाय यांची सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. या ग्रंथांचे उद्दिष्ट केवळ उपचार नव्हे तर रोगप्रतीबंधक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे मार्गदर्शन करणे असे आहे.

कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी पुस्तकाविषयी सकारात्मक प्रतिसाद देत त्याचे स्वागत केले. प्रकाशन सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला.