संजय राऊत, रोहित पवार यांच्या विरोधात हक्कभंगाचा खटला दाखल

संजय राऊत, रोहित पवार यांच्या  विरोधात हक्कभंगाचा खटला दाखल

मुंबई : भाजप मंत्री जयकुमार गोरे, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाचा खटला दाखल केला आहे. काल(५ फेब्रुवारी) जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर "न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे आणि ज्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले आहेत त्यांच्याविरुद्ध मी मानहानीचा खटला दाखल करेन." असे म्हटले होते. त्यानुसार आता जयकुमार गोरे संजय राऊतांसहीत रोहीत पवार आणि लय भारी युट्युब चॅनल विरोधात हक्कभंगाचा खटला दाखल केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. खासदार संजय राऊत म्हणाले, "स्वारगेटमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबतही अशी घटना समोर येत आहे. गोरेंनी एका महिलेवर कसा अत्याचार आणि विनयभंग केला आहे याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाची छाननी करावी. राज्य मंत्रिमंडळात जयकुमार गोरें सारखे विकृत मंत्री आहेत. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करावा लागेल. अशा मंत्र्यांना काढून टाकले पाहिजे. हे महिलांचा छळ करणारे मंत्री आहेत. जर हे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात राहिले तर देवेंद्र फडणवीस महिलांवरील अत्याचारांविरुद्ध कसे बोलतील? ती असहाय्य महिला येत्या काही दिवसांत विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे".

दरम्यान, गोरे यांनी, न्यायालयाने त्यांना आधीच निर्दोष मुक्त केले असल्याचे म्हटले. एका महिलेला अश्लिल फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप होता. संजय राऊत यांनी पुन्हा ही घटना मांडल्यानंतर, विरोधक धनंजय मुंडेंनंतर आता महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. परंतु हा खटला २०१७ मध्ये दाखल करण्यात आला होता. आणि २०१९ मध्ये न्यायालयाने मला त्यातून निर्दोष मुक्तही केले असल्याचे गोरे म्हणाले. "राजकीय नेत्यांनी संयम बाळगावा. विरोधी पक्ष खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. मी हे आरोप करणाऱ्यांविरुद्ध विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणणार आहे आणि त्यांच्याविरुद्ध मानहानीचे खटलेही दाखल करणार आहे" असे गोरे म्हणाले.