हिंदी सक्तीवरून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस आमने - सामने

मुंबई - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शाळांमध्ये तिसऱ्या भाषेच्या रूपात हिंदी सक्तीने शिकवली जाणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दाव्याचा जोरदार प्रतिवाद केला असून, "मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत," असा आरोप करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर सवालांचा भडिमार करत म्हटलं की, "गुजरातसह इतर अनेक राज्यांमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच असा निर्णय का? उत्तरेतील नेत्यांचा हा महाराष्ट्रातील सुसंस्कृतीवर हक्क मिळवण्याचा डाव आहे. काही आयएएस अधिकारी मराठी शिकायला लागू नयेत म्हणून हिंदी लादण्याचा डाव करत आहेत का?" असा थेट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर प्रत्युत्तर देताना स्पष्ट केलं की, "हिंदीची सक्ती पूर्वी होती, मात्र आता ती अनिवार्यता रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही भारतीय भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात निवडता येईल. मातृभाषा अनिवार्य असून, त्यासोबत इतर दोन भाषांपैकी एक भारतीय भाषा असावी, असा नवा नियम आहे. हिंदीचा पर्याय दिला गेला कारण त्या भाषेचे शिक्षक सहज उपलब्ध आहेत. मात्र हिंदी सक्तीची बाब आता अमलात नाही."
फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं, "भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा कमी नाहीत. इंग्रजीचा अतिरेक आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही. शिवाय, नवीन धोरणामुळे मराठीचं स्थान अधिक भक्कम होईल. महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेच्या स्वरूपात हिंदीसह कोणतीही भारतीय भाषा निवडता येईल."
राज ठाकरे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत स्पष्ट केलं की, "पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय आम्ही होऊ देणार नाही. सरकारला हे चॅलेंज म्हणून घ्यायचं असेल, तर त्यांनी ते घ्यावं."
या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात राज ठाकरे यांची मनसे आणि राज्य सरकार यांच्यात या मुद्द्यावरून संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.