पुतण्याचा काकांना पुन्हा एकदा दणका, 'हा' माजी आमदार करणार अजित पवार गटात प्रवेश
नगर :अजित पवार यांनी काका शरद पवार यांना पुन्हा एकदा राजकीय दणका दिल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षातून निलंबित केलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. जगताप यांनी श्रीगोंद्यातून बंडखोरी केल्यानंतर पवार गटाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा भाव वधारला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.यातच शरद पवार गटाचा नेता प्रवेश करणार म्हटल्यावर त्याची चर्चा तर होणारच.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून निलंबन
राहुल जगताप हे माजी आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षात होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून शरद पवारांकडे तिकीट मागितलं होतं. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला गेला. त्यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्याचवेळी पवार गटाने त्यांचे पक्षातून निलंबनही केले.
अपक्ष लढूनही घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते
महायुतीचे उमेदवार असलेले भाजप नेते विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून जगतापांना पराभव स्वीकारावा लागला. पाचपुते यांना ९८ हजार ९३१ मतं मिळाली, तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अनुराधा नागवडे यांना ५३ हजार ९६ मतं मिळाली. मात्र राहुल जगताप यांना अपक्ष लढूनही दुसऱ्या क्रमांकाची ६२ हजार ३७ मतं मिळाल्याची माहिती आहे. म्हणजेच महाविकास आघाडी ने जगतापांना तिकीट दिलेले असते तर कदाचित महाविकास आघाडीची एक जागा वाढली असती.
लवकरच करणार पक्षप्रवेश
राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राहुल जगताप हाती 'घड्याळ' बांधण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.